Monday, 10 September 2012

पगारी बायको


नुकतीच पेपरला बातमी वाचली - केन्द्रीय महिला आणि बालकल्याण विभागाने नवीन विधेयकाचा प्रस्ताव आणला आहे - पुर्णवेळ गृहिणी आता पगारी होणार. म्हणजे दर महिन्याला त्यांचे पतीदेव त्यांना मासिक वेतन देणार.... किती ? तर पतीच्या पगाराच्या १०%.... सही ना !!!! पण खरी गम्मत हि आहे कि खरोखर जर असे विधेयक मंजूर होऊन त्याचा कायदा झाला तर जी काही मजा उडेल त्याच काय ? काय होऊ शकेल ह्या कायद्यामुळे ?  जरा गमतीने पहिले ह्याकडे तर -

१. जर पत्नी पगार घेत असेल तर दर वर्षी पगारवाढ आली. पगारवाढ आली म्हणजे तिचा "Annual Performance" पाहायला नको का ? "Annual Appraisal" हि करायला पाहिजे !! मग हे करताना कुणाला तरी कमी जास्त रेटिंग मिळणारच. मग काहीसे असे संवाद होतील घराघरात -
"अहो, हे काय फक्त ८% चा वाढवून दिलाय तुम्ही मला पगार ..."
"अग, मग तुला किती अपेक्षित होता ?"
"आता शेजारच्या जोशी वहिनींना पहा ... भावोजींनी चांगला १२% वाढवून दिलाय ह्यावर्षी पगार !!"
"अग, जोशी वहिनींची गोष्ट  वेगळी आहे.. त्यांचा performance(!!??!!) असतोच तसा .."
झाले... म्हणजे नवरा बायकोमध्ये अगोदरच  होणारया  जिव्हाळ्याच्या  शाब्दिक  आदान  प्रदानात  आणखी एका विषयाची भर ...

२. ह्या विधेयकाचा आम्ही काही बारकाईने अभ्यास केलेला नाही, पण हा पगार देताना TDS कापून द्यायचा का नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. तसे असेल, तर हि रक्कम बायकोला करपात्र करून नवरयासाठी करमुक्त करावी.. म्हणजे कदाचित पुरुषवर्गात थोडेतरी उत्साहाचे वारे येईल.

३. ह्या विधेयकाच्या पुष्ट्यर्थ असे हि सांगण्यात आले कि जर  पाळणाघरासाठी  किंवा  हॉटेलमध्ये  जेवण्यासाठी आपण पैसे मोजत असू तर त्यापेक्षा कितीतरी अधिक काम करणाऱ्या   गृहिणीसाठी  का  नाही ?  काही संबंध आहे का ? पाळणाघरात असलेली ताई आणि घरात असलेली आई एकाच तराजूत ? त्यांच्यात काही फरकच नाही ? हॉटेल मध्ये तुम्ही सांगाल ते आणून देणारा वेटर आणि तुमच्या मनातले ओळखून तुम्हाला आवडणारे पदार्थ बनवणारी बायको सारखेच ? म्हणजे जर कधी भाजीत मीठ जास्त पडले किंवा थालीपीठ खाली थोडे लागले तर पगारातून पैसे कमी करायचे का ?
Dominos सारखे ऑफिस मधून आल्यावर १० मिनिटात चहा हातात नाही आला तर पगारातून  कापून  घेण्यात येतील ?

ह्यातला विनोद बाजूला ठेवून खरच विचार केला आणि खरच जर असा काही कायदा आला.... आपल्या सरकार चे काही सांगता येत नाही हो ...... तर ह्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही.. स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करणाऱ्या आणि पुरुषप्रधान संस्कृती च्या नावाने झोपेतही वाटेल तितका वेळ बोलू शकणाऱ्या तथाकथीत कार्यकर्त्यांना हे झेपते का ? ह्याने नवरा  बायको हे "संसाररूपी गाड्याची दोन चाके" न राहता "employer - employee" मालक नोकर ह्या एका नव्या नात्यात जातील. विचित्र आहे हे.... संस्कृती आणि समाजव्यवस्था  वगैरे मोठे शब्द राहू द्या पण ज्यांना पती पत्नी च्या नात्यातले हळवेपण, आपुलकी, ओलावा जपायचा आहे अशा सर्वांनी ह्या आणि अश्या  प्रकारच्या  विधेयकाला विरोध करायला हवा ....  

No comments:

Post a Comment