Wednesday, 29 April 2015

माध्यम.... मराठी का इंग्रजी ???

परवा आम्ही मित्र-मित्र बोलत असताना पुन्हा एकदा मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम हा विषय निघाला. पुन्हा एकदा म्हणजे आधी अक्षरश: शेकडो वेळा या विषयावर आमचे बोलणे झाले आहे...पण मी शक्यतो त्या वादात पडलो नाही...

तथाकथीत मत हे आहे...आणि लेखक भालचंद्र नेमाडे यांनीही ते बोलून दाखवले आहे..... की सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळा ह्या चूक आहेत आणि जर आपल्याला मराठी भाषा टिकवायची असेल तर मुलांना मराठी शाळेत घाला आणि जे पालक त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात, ते मराठीचे, मराठी भाषेचे कट्टर वैरी आहेत.. अशा पालकांना वाटतच नाही की मराठी भाषा टिकावी म्हणून....आणि आपण इथे फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळांविषयी बोलतोय....CBSE, ICSE नाही....

ह्या स्वयंघोषित भाषाप्रेमींचा एकेक मुद्दा घेऊ....

मुद्दा 1: "तुम्ही स्वत: मराठी शाळेत शिकलात ना...मग मुलांना मराठी शाळेत का नाही घातले?"

माझा पहिला प्रश्न ..."तुम्ही घातलेय का?"...खूप वेळा उत्तर "नाही"..असेच येते...म्हणजे मुद्दाच संपला ना... तरीसुद्धा...मी मराठी शाळेत गेलो....हो...पण मी माझ्या मुलींना इंग्रजी शाळेत घातलेय...कारण..मी शाळेत असताना तेव्हाचे शिक्षक...त्यांचा दर्जा,त्यांची विषय स्वत: समजून घेण्याची आणि मग तो विद्यार्थ्यांना समजून देण्याची कुवत ह्या गोष्टी आता कुठे पाहायला मिळत असतील तर सांगा...ना ते शिक्षक राहिले..ना तशा तत्वांना अनुसरुन काम करणार्‍या शाळा ...
इथे मराठी शाळांमधील शिक्षकांना ना धड शुद्ध मराठी बोलता येत...ते मुलांना काय शिकवणार?
ह्याला अपवाद असणार्‍या शाळा असतीलही ..अजुनही काही काही शाळा चांगल्या असतील...पण किती?? आणि सगळ्यांची मुले त्या इतक्या कमी शाळांमधे कशी जाणार? आज मराठी माध्यमाच्या शाळा चालवणे अवघड झालेय ते केवळ मराठी मुले इंग्रजी माध्यमाकडे वळतात म्हणून नाही..तर त्या दर्जाच्या शाळा आणि शिक्षक नाहीत म्हणूनसुद्धा !!!!! आहेत ते फक्त "गुर्जी" आणि "म्याडम"...

मुद्दा 2: "इंग्रजी माध्यमात घातल्याने मुलांना मराठीची गोडी कशी लागणार?"

मराठी माध्यमात घातल्याने मुलांना आपोआप मराठीची गोडी लागते? आजही कितीतरी मराठी शाळांमध्ये सातवी-आठवीच्या मुलांना धड एक परिच्छेद पूर्ण वाचता येत नाही...आणि मुलांना एकदाचे मराठी शाळेत घातले की पालक म्हणून तुमची जबाबदारी संपली का ? शाळेत मुले कमी वेळ असतात..घरी जास्त असतात... मुलांना मराठीची गोडी लागावी म्हणून तुम्ही काय करताय ? किती वेळा त्यांना मराठी गोष्टी वाचून दाखवता? किती मराठी गोष्टीची पुस्तकं आणून देता ? किती वेळा त्यांच्याशी चांगल्या आणि ऊच्च प्रतीच्या मराठीत बोलता ? माझ्या ओळखीचे एकजण आहेत..ते त्यांच्या मुलांशी स्पर्धा लावतात की जो सलग जास्तीत जास्त वाक्य मराठीत बोलेल तो जिंकला... सुरुवातीला थोडे दिवसच मुलांनी त्यांना जिंकण्याचा आनंद दिला... आणि नंतर हरण्यात त्यांना जास्त आनंद वाटु लागला...कारण....उद्दिष्ट साध्य झाले होते....त्यामुळे भाषेची गोडी ही फक्त शैक्षणिक माध्यमावर अवलंबून नसून त्यात पालकांचा फार मोठा सहभाग असावा लागतो...

मुद्दा 3: ""इंग्रजी शाळेत गेली की मुले आपली संस्कृती विसरतात... त्यांना आपली संस्कृती शिकवली जात नाही.."

अहो..पण त्यांच्यासाठी शाळा कुणी निवडली ? तुम्हीच ना...आजही खूप इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत जिथे आपली संस्कृती शिकवली जाते...सगळे सण-समारंभ साजरे होतात...पहिलीपासून मराठी शिकवले जाते...उच्च माध्यमिक, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण ज्या भाषेत आहे, त्या भाषेत जर मुले पहिल्यापासुन शिकली तर त्यांना पुढे अवघड जात नाही.... शाळा निवडताना नीट चौकशी करून निवडली तर तुम्हाला सुवर्णमध्य नक्की साधता येईल.. 

शेवटी काय...हे ज्याचे त्याचे मत झाले...पण...दांभिकपणे नुसती चर्चा न करता जर आपण आपल्या परीने काय करू शकतो ह्याचा विचार केला तर मार्ग नक्की सापडतो.... मुले कुठल्याही माध्यमात शिकली तरी...ती "शिकताहेत" का नाही....हे पाहणे पालक म्हणून तुम्ही कराल तर माध्यम आडकाठी असणार नाही....

धन्यवाद!!!!!!!


2 comments:

  1. Nice one...

    Do keep writing

    ReplyDelete
  2. खूप छान रे राहुल.... एकूण एक मुद्दा आणि त्यावरील उत्तर अगदी सडेतोडपणे लीहले आहेस . खरच आपण ह्या विषयावर कुणाशीही बोलण्या आधी आत्मचिंतन करून बघावे कि आपण तरी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात खरच का घातले?
    खरच माध्यम कुठलेही असो.... आपण काय शिकतो आणि ते कसे आचरणात आणतो ते महत्वाचे...

    ReplyDelete