Monday, 2 May 2011

मित्र

कुठल्याही नविन कामाची सुरुवात देवाच्या नावाने करावी असे म्हणतात. देव आहे की नाही हे माहित नाही. पहिलाच ब्लॉग लिहितोय... देवाच्या नावाने लिहावा का ? काय लिहिणार  आपण  देवाबद्दल ?  आपल्याला कुठे  देव भेटलाय ? आणि हो.. देवाबद्दल आपण काही लिहावे अशी अजुन आपली पात्रता नाहीये. आपण आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावर लिहावे..... मित्र..

आत्तापर्यंत इतक्या लोकांनी मित्र आणि मैत्रीण ह्या विषयावर लिहिले आहे की अजुन नविन काय लिहिणार ?  पण कधी कधी खरच मनात विचार येतो... कुणाला नक्की मित्र म्हणावे ? फार वेगवेगळ्या व्याख्या असतात लोकांच्या मित्रांबद्दल... त्यात माझीही भर..

तुम्ही किती वेळा भेटता किंवा किती वेळा फ़ोनवर बोलता ह्या वर तुम्ही किती चांगले मित्र आहात हे अवलंबून नसते.. माझा एक मित्र आहे... बहुतेक वेळा आठवड्यातुन एकदा त्याच्याशी बोलणे होते फोनवर.. फ़ोनवरचा संवाद ठरलेला असतो...

"काय रे , काय म्हणतोस ?"
"काही नाही.. ठीक आहे. तू काय म्हणतोस ?"
"मी ही ठीक आहे. ऑफिस काय म्हणते ?"
"चालू आहे. बाकी काय ?"
"बाकी काही नाही. चाललय. अजुन काय विशेष ?"
"अजुन काही नाही. बस मजेत."
"चल मग ... बोलू नंतर.."

फ़ोन संपतो.  बोलू नंतर... काय ? कपाळ.... नंतर काय बोलायचे ते ही ठरलेले असते... हाच वरचा dialogue पुन्हा पुन्हा नव्याने बोलल्यासारखा..
मित्रांशी बोलताना मला २ प्रश्नांचा भयंकर राग आहे... "बाकी काय ?" आणि "अजुन काय विशेष ?"
हे प्रश्न निव्वळ वेळकाढू आहेत.. अश्या मित्रांच्या मैत्रितला भाजक भाज्याला पूर्ण भागून जातो आणि शेवटी बाकी शुन्य करून ठेवतो.

पण सुदैवाने अश्या प्रकारच्या मित्रांपेक्षा ज्यांना खरे म्हणता येतील असे जीव लावणारे मित्र जास्त भेटले (म्हणजे मिळाले ह्या अर्थी नाही.. तर खरोखर भेटले ह्या अर्थी) ह्यासाठी देवाचे आभार... इतकाच काय तो ह्या पहिल्या ब्लॉग चा अणि देवाचा संबंध... 

काय सुन्दर मित्र दिले हो... दिवसभराचा कामाचा थकवा संपवून रात्रि कट्ट्यावर जावे आणि गप्पा मारत बसाव्या.... इतके विविध विषय असतात बोलायला... दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पलुन जातो.

अहो, नुसत्या एका "hmmm ..." मधून हा होकार आहे का हुंकार आहे का खोचक अणि खवचट उत्तर आहे हे केवळ अणि केवळ खरे मित्रच ओळखु शकतात हो... एकदा मी चुकून "बाकी शुन्य" येणारया  मित्राला "hmmm" असा sms केल्यावर त्याने "म्हणजे नक्की काय समजू ?" असा प्रति sms केला. मी अगोदर "अरे म्हणजे.." असे लिहायला लागलो... त्यातले फोलपण जाणवले .... त्याला सरळ सांगितले... "तुला काय समजायचे ते समज.."

एखाद्या गाण्याची ओळ आपण गुणगुणावी आणि पुढची ओळ येत नाही.. पण गाणे तर आवडले हे ओळखून ते गाणे शोधून लगेच मेल करणारा ... तो मित्र..
मनातली दुख विसरायला लावून चार क्षण आनंदाचे करून सोडणारा.. तो मित्र...
दहा वर्षांनी भेटून सुध्धा ३ तासाच्या भेटीत एकदाही "अजुन काय" आणि "बाकी काय" ही वाक्य चुकुनही न येणारा... तो मित्र.... आणि हो.... मैत्रीण सुध्धा...
चार चार वर्ष न भेटून सुध्धा मनातली एखादी गोष्ट ज्याच्याशी share कराविशी वाटते... तो मित्र...
अश्या मित्रांची बाकी वाढतच जाते... आणि तीच आयुष्यातील शिल्लक बनून राहते...

No comments:

Post a Comment